बीडः आजीसोबत देवदर्शनासाठी निघालेल्या चार वर्षीय नातवाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली. आजीचा हात धरून पायी जात असताना या मुलाला भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं. यात त्याचा अपघात स्थळीच मृत्यू झाला. तर मुलाची आजी गंभीर जखमी झाली आहे. या भीषण अपघातामुळे बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कुठे घडला अपघात?
14 जानेवारी रोजी रात्री उशीरा गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील कल्याण- विशाखा पट्टणम् या महामार्गावर ही घटना घडली. चार वर्षांचा चिमुकला त्याच्या आजीसोबत या रस्त्याने देवाच्या मंदिरात जाण्यासाठी निघाला होता. मात्र मागून येणाऱ्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने या दोघांनाही चिरडले. याच चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माऊली अनिरुद्ध चव्हाण, वय 4 वर्षे रा.वंजारवाडी असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर सुमनबाई जालिंदर चव्हाण असे जखमी झालेल्या आजीचे नाव आहे.