जातेगाव : अतिवृष्टीने केळीच्या बागेसह खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी त्यावरती केलेला खर्चही पदरात पडला नाही. शिवाय दोन वर्षांपासून कोरोना साथीने विम्याचे काम मंदावल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका ३९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १०) रोजी गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे घडली. अशोक बाजीराव पवार (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
पवार कुटुंबाचा पाच एकर जमिनीत उदरनिर्वाह चालत होता. घरात दहा-बारा जणांच्या कुटुंबाचा प्रपंच चालणे कठीण होत असल्याने अशोक पवार हे शेती करुन पाच वर्षांपासून विमा कंपनीच्या एजंट यांच्या अधिपत्याखाली काम करीत असतानाच विमा एजंट झाले. यामुळे कुटुंबियांना आर्थिक अडचणीस हातभार मिळू लागला. पुढे भाऊ विभक्त झाला आई वडील पत्नी आणि तीन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आली. शिवाय दोन वर्षांपासून कोरोना साथीने विम्याचे काम मंदावले. परिणामी भाव वाटणीने आलेल्या अडीच एकर जमिनीपैकी एक एकर केळी लागवड करुन उर्वरित दीड एकरात खरीप पिक घेतले. परंतु अतिवृष्टीने केळी बाग उध्वस्त झाली. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन खरडून गेली. केळी बागेस व खरीप पिकास केलेला खर्च पदरात पडला नाही. विम्याचा व्यवसायाला कोविडमुळे लगाम बसला, परिणामी आर्थिक चणचण निर्माण होऊ लागली. त्यामुळे आता मुलांचे शिक्षण कसे होणार ? याची चिंता अशोक पवार यांना मागील काही दिवसांपासून सतावत होती. या विवंचनेतून अशोक पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.