Advertisement

कापूस भरण्यास मजुर घेऊन चाललेला टेम्पो पलटी

प्रजापत्र | Sunday, 02/01/2022
बातमी शेअर करा

गेवराई : मजूरांसह कापूस भरण्यासाठी चाललेला भरधाव वेगातील टेम्पो अचानक पलटी झाल्याने या अपघातात टेम्पोतील एक जण ठार तर एका पंधरा वर्षीय मुलाचा हात कोपरापासून तुटला असून अन्य सात मजूर जखमी झाले. हि घटना रविवार दि.२ रोजी गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरील सुर्डी बुद्रुक येथे आज दुपारी घडली. दरम्यान जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारास औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

 

 

याबाबत माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील कापसाचे खासगी व्यापारी यांनी गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथे कापूस खरेदी केला होता. याठिकाणी दहा ते पंधरा क्विंटल कापूस भरुन टेम्पो (एम.एच.२१- ६९८१) हा दहा ते बारा मजूरांना घेऊन पुन्हा टाकरवणकडे जात होता. दरम्यान गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरून भरधाव वेगात चाललेला टेम्पो गेवराई तालुक्यातील सुर्डी बुद्रुक जवळपास येताच अचानक चालकाचा ताबा सुटल्यामुळे पलटी झाला.

 

 

यावेळी टेम्पोतील अनिल एकनाथ लव्हाळे (वय ३० ) रा. टाकरवण या मजुराचा मृत्यू झाला. तर गणेश कोटूळे, रमेश भोसले, जालींदर पटेकर, गोविंद लव्हाळे, बाळू लव्हाळे सर्व रा. टाकरवण जखमी झाले आहेत. त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे. यापैकी पंधरा वर्षीय कृष्णा लव्हाळे या मजूराचा कोपरापासून हात बाजूस तुटून पडल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement