अवैध वाळू वाहतूकीने आणखी एक बळी घेतल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. अवैधरित्या वाळू घेऊन निघालेल्या भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना गेवराई तालुक्यातील खामगाव येथे आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास राक्षसभुवन फाट्यावर घडली. गेवराई तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतूकीचा आत्तापर्यंत हा 9 वा बळी असून जनतेतून हा हप्तेखोरीचा बळी असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तुकाराम बाबूराव निंबाळकर (वय 42 वर्ष ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून महामार्गावरच ठिय्या मांडला असून याठिकाणी तणावाचे वातावरण आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत तुकाराम निंबाळकर हे आपल्या दुचाकीवरून (एम.एच. 23ए.ए.8126) गेवराईकडे येत असतांना अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. याठिकाणी निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक ट्रैक्टर सोडून पसार झाला. तर घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ग्रामस्थांनी महामार्गावरच ठिय्या मांडून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत महामार्गावरून उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी यावेळी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होतेगेवराई तालुक्यातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा करुन ती वाहतूक केली जाते. हि वाहतूक महसूल तसेच पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरु आहे. त्यामुळे वाळू माफिया रस्त्यावरील नागरिकांना उडविण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हा तालुक्यातील 9 वा बळी आहे. गत दोन वर्षापूर्वी गंगावाडी येथे अशाचप्रकारे हायवाने एका पादचारी इसमास चिरडले होते. यामध्ये सदरील नागरिकाच्या मासांचा अक्षरशः सडा पडला होता. या किळसवाणी घटनेनंतर याठिकाणी ग्रामस्थांनी तब्बल चार तास ठिय्या दिला होता. यानंतर देखील अशा घटना सातत्याने सुरु असून याविरोधात जनतेतून तिव संताप व्यक्त केला जात आहे.