गेवराई - शनिवारी रात्री गेवराई बसस्थानकासमोरील सद्गुरू एंटरप्राइजेसचे दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातील लँपटाँप, मोबाईलसह अन्य काही वस्तू लंपास केल्या आहेत . दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. तर यामध्ये जवळपास 1 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज आहे.
गेवराई बसस्थानकाच्या समोर सद्गुरू एंटरप्राइजेसचे दुकान आहे. दरम्यान शनिवारी रात्री चोरट्यांनी या दुकानाच्या पाठीमागून पत्रा कापून आत प्रवेश केला. यानंतर दुकानातील एक लँपटाँप, मोबाईल व अन्य काही किंमती वस्तू असे मिळून जवळपास एक लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी लंपास केला. सकाळी दुकान उघडण्यासाठी दुकानमालक आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता यामध्ये चोरटे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहेत. तर याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.