देशात दरवर्षी सव्वा लाखापेक्षा जास्त लोक आत्महत्या करत आहेत. २०२० च्या कोरोनाकाळात देशात सर्वात जास्त आत्महत्यांचा विक्रम झाला. धक्कादायक बाब म्हणजे गरिबीमुळे जीव देणाऱ्यांची संख्या गतवर्षी ७०% पर्यंत वाढली. २०२० मध्ये गरिबीमुळे १९०१ जणांनी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये हा आकडा ११२२ होता. २०१८ मध्ये गरिबीमुळे जीव देणाऱ्यांत ६.७% घट झाली होती. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या २८५१ वरून ३५४८ (२०१९ पासून २४.४% वाढ) झाली. दुर्दैवाने या दोन्ही कारणांमुळे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या.
एनसीआरबीनुसार, २०२० मध्ये १.५३ लाख लोकांनी आत्महत्या केली. २०२० मध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरू होता. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये आत्महत्यांचे प्रमाण १०% वाढले. २०१० ते २०१९ पर्यंत हा आकडा एकदाही १.३९ लाखांवर गेला नाही. गतवर्षी आत्महत्येचे सर्वात मोठे कारण ‘कौटंुबिक समस्या’ व ‘आजारपण’ हे होते.
चिंता : २०१९ च्या तुलनेत १४ हजार जास्त लोकांच्या आत्महत्या
वर्ष २०२० मध्ये आत्महत्या करणाऱ्या एकूण १,५३,०५२ लोकांपैकी १,०८,५३२ पुरुष व ४४,४९८ महिला होत्या. पैकी ३३.६% लोकांनी काैटुंबिक समस्या व १८% ने आजारपणामुळे आयुष्य संपवले. २०१९ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे ३२.४% आणि १७.१ टक्के इतके होते.
केवळ ४ राज्यांत गरिबीमुळे जीव देणारे वर्षभरात दुपटीवर
महाराष्ट्र, आसाम, कर्नाटक आणि गुजरातमध्ये एकाच वर्षात गरिबीमुळे मृत्यूला कवटाळणारे ५७१ वरून १११४ पर्यंत वाढले. याच राज्यांत बेरोजगारीमुळे आत्महत्या करणारेही २०१९ मधील १३७९ च्या तुलनेत २०२० मध्ये १८०८ वर गेले. तथापि, झारखंडमध्ये गरिबीमुळे आत्महत्येचा मार्ग पत्करणारे २०१९ वर्षातील २४ जणांच्या तुलनेत २०२० मध्ये घटून १२ वर आले आहेत.
सन २०२० मध्ये महाराष्ट्रात तब्बल १९,९०९ आत्महत्या
२०२० मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त १९,९०९ जणांनी आयुष्य संपवले आहे. तामिळनाडू (१६,८८३) दुसऱ्या, मध्य प्रदेश (१४,५७८) तिसऱ्या, प. बंगाल (१३,१०३) चौथ्या व कर्नाटक (१२,२५९) पाचव्या स्थानी आहे. महाराष्ट्र व तािमळनाडू सलग चौथ्या वर्षी टॉप-२ मध्ये आहेत. आत्महत्या करणाऱ्यांत सर्वाधिक २४.६% रोजंदारी कामगार व १४.६% गृहिणी होत्या. ११.३% लोक व्यावसायिक होते.