चंद्रपूर : राज्यभरातील विविध ठिकाणी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST bus strike) आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत असल्याचा ठपका ठेवत विविध मागण्यांसाठी संप करणार्या चंद्रपूर विभागातील वाहतूक नियंत्रकासह १४ कर्मचार्यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आलं आहे. निलंबन काळात संबंधित कर्मचार्यांनी आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश चंद्रपूर विभागाच्या वाहतूक अधीक्षकांनी दिले आहेत.
या कारवाईने राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील कर्मचार्यांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. संप करणार्या अन्य कर्मचार्यांवर निलंबनाची टांगती तलवार उभी असल्याची शक्यता रापमच्या चंद्रपूर विभागात आहे. निलंबित कर्मचार्यांमध्ये चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, वरोडा, राजुरा व चिमूर आगारातील विविध पदांवर काम करणार्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
एसटी महामंडळात काम करणार्या कर्मचार्यांना अत्यल्प वेतन मिळते. त्यामुळे कुटुंब चालवणं त्यांना कठीण होत चाललं आहे. समान काम, समान वेतन या तत्त्वावर किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं, अशी मागणी कर्मचार्यांनी केली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचार्यांनी २९ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केलं. त्यानंतर त्यांनी संप पुकारला आहे.
या आंदोलनाचा मोठा फटका महामंडळाला बसत आहे. १२ दिवस लोटल्यानंतर अद्याप विलिनीकरणाच्या मागणीवर तोडगा काढण्यात आला नाही. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा कर्मचार्यांनी दिला आहे. या सर्वच आगारांतून ६०० ते ७०० फेर्या होतात. मात्र, संप सुरू असल्याने या सगळ्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, औद्योगिक न्यायालयाने कर्मचार्यांचा संप अवैध ठरवला होता. तशी नोटीस आगार फलकावर लावली गेली. कर्मचार्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवल्याने महामंडळाचे नुकसान झालं असून प्रवाशांचेही हाल होत असल्याचा ठपका ठेवत चंद्रपूर विभागातील १४ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रापमच्या विभागीय वाहतूक अधीक्षकांनी दिली आहे.