Advertisement

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयूला आग

प्रजापत्र | Saturday, 06/11/2021
बातमी शेअर करा

अहमदनगर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटना घडली तेव्हा १७ रुग्ण आयसीयूमध्ये कोरोनावरील उपचार घेत होते. त्यापैकी १० जणांचा होरपळून मृत्यू झाला तर सात जण भाजल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे यावेळी भोसले यांनी सांगितले. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ६० ते ७० वयोगटातील आहेत.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागातल्या एसीला आग लागली. बचावकार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे तसंच आगीमुळेही गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे होरपळून झाला की गुदमरुन झाला याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसंच मृतांच्या परिवाराला आवश्यक ती मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर कार्य करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आगीनं होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आपण घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “मी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून मी काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होती. जे कोणी या घटनेमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तसंच मृतांच्या परिवाराला मदत देण्यात येणार आहे”.
 

Advertisement

Advertisement