नवी दिल्ली - बिहारच्या गोपाळगंज आणि पश्चिमी चंपारण जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत विषारी दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. विषारी दारूने ग्रामस्थांचा बळी घेतला आहे. तसेच मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. गुरुवारी चंपारणच्या बेतिया गावामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गोपाळगंजमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये बिहारमध्ये दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोकांची यामुळे दृष्टी गेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली, काहींचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. पोलीस अधिकारी आनंद कुमार यांनी गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील मुहम्मदपूर गावात काही लोकांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. जोपर्यंत त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मृत्यू मागचं नेमकं कारण समजणार नाही. तसेच तीन टीम याचा तपास करत असल्याचं म्हटलं आहे. बिहारमधील बेतिया गावातील आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.