दिल्ली : देशभरात इंधनाच्या वाढत्या किंमतींनी हाहाकार माजवलेला असतानाच दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने सामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोल लिटरमागे 5 ते डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे.
देशभरात मागच्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याचे सांगत तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवित आलेल्या आहेत. यामुळे देशभरात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे.
पेट्रोलचे उत्पादन शुल्क लिटरमागे 5 रुपयांनी तर डिझेलचे उत्पादनशुल्क लिटरमागे 10 रुपयांनी कमी करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या किंमती त्या प्रमाणात कमी होणार आहेत. मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत.