Advertisement

राज्यात रेशनवरील साखर, रवा, डाळी, तेल गायब

प्रजापत्र | Tuesday, 02/11/2021
बातमी शेअर करा

मुंबई : दिवाळीसाठी “स्वस्त’ धान्य दुकानांमधून गरिबांसाठी माफक दरात मिळणारी साखर, रवा, डाळी व तेल यंदा गायब झाले आहे. खुल्या बाजारातील साखर, तेल आणि डाळींचे कडाडले भाव आणि रेशन दुकानातून बाद करण्यात आलेले हे घटक यामुळे राज्यातील गरिबांची दिवाळी यंदा कडूच होणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत समाविष्ट राज्यातील ८.५० कोटी नागरिक प्राधान्य कुटुंब गटातील असून रेशनवरून मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर अवलंबून आहेत.

सोमवारपासून सुरू झालेल्या दिवाळीत घरोघरी फराळाचा खमंग दरवळ सुटला असला तरी दारिद्र््य रेषेखालील गोरगरीबांसाठी हा फराळ कठीण झाला आहे. दिवाळीच्या काळात रेशनवरून मिळणाऱ्या स्वस्त तेल, डाळी व साखरेमुळे या गरीब कुटुंबांची दिवाळी काही प्रमाणात “गोड’ होत असे. मात्र, यंदा रेशन दुकानांमधून यांचा पुरवठा न करण्यात आल्याने गरीब शिधापत्रिकाधारकांना दिवाळीच्या फराळासाठी आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.

निधीअभावी अडचण, पुढल्या वर्षी प्रयत्न करू
हे घटक स्वस्त धान्य दुकानातून द्यावेत हे नियमाने बंधनकारक नाही, मात्र तत्कालीन परिस्थितीनुसार सरकार दिवाळीच्या काळात यांचा पुरवठा करीत असते. या वेळीही त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र, निधीअभावी ते शक्य झाले नाही. नियमानुसार देण्यात येणाऱ्या गहू व तांदळाचा पुरवठा वेळेत व्हावा हे आदेश देण्यात आले आहेत. दिवाळीसाठी किफायतशीर दरात अन्य घटक देण्याचा पुढील वर्षी प्रयत्न करू. – छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

राज्यातील रेशन कार्डधारक

  कुटुंबे : १ कोटी ६२ हजार २५ हजार ८३० – रेशनवर अवलंबून असलेेले प्राधान्यक्रम नागरिक : ८ कोटी ५० लाख – एकूण रेशन दुकानांची संख्या : ५२ हजार ५५० – सक्रिय दुकाने : १८,४४३, गरीब कल्याण अन्न योजना कार्ड : १ कोटी ७ लाख ९१ हजार ३३२

Advertisement

Advertisement