गेवराई-वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार दरवर्षी शेतकर्यांच्या मुळावर असतो. सध्या रब्बी हंगाम सुरू असून पीकांना पाणी देण्यास सुरूवात झाली. अशा परिस्थितीत विजेच्या पुरवठ्या बाबत वीज वितरण कंपनी गांभीर्याने घेत नसल्याने शेतकर्यांचे नुकसान होवू लागले. डिपी दुरूस्त करण्यासाठी शेतकर्यांना अनेक दिवस कंपनीच्या दारासमोर थांबण्याची वेळ येते. शेतकर्यांच्या पिळवणूक थांबवण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी आज मनसेच्या वतीने गोंधळ आंदोलन करण्यात आले. सदरील हे आंदोलन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली झाले.
डिपी दुरूस्तीसाठी शेतकर्यांकडून ८० टक्के वीज बील घेण्याची अट रद्द करण्यात यावी. जळालेली डिपी विनाअट तात्काळ दुरूस्त करून देण्यात यावी. महावितरण कार्यालयाकडून सध्या सुरू असलेली सक्तीची वीज बील वसुली रब्बी पीक शेतकर्यांच्या हातात येईपर्यंत थांबवण्यात यावी. गेवराई तालुक्यातील शेतकर्यांना मंजुर झालेला १ शेतकरी १ डिपी तात्काळ देण्यात यावी. ज्यांनी कोटेशन भरले आहेत त्यांना तात्काळ डिपी देण्यात यावा. चुकीचे बील दुरूस्त करणेसाठी कॅम्प लावण्यात येवून चुकीचे बीले दुरूस्त करण्यात यावे. यासह इतर मागण्यासाठी महावितरण कार्यालयासमोर मनसेचे गोंधळ आंदोलन सुरू आहे. सदरील हे आंदोलन राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून यावेळी निळकंठ वखरे, जयदीप गोल्हार, कृष्णा राठोड, रवि मर्कड, अशोक बेडके, अशोक नरवडे, विठ्ठल पठ्ठे, जगन राऊत, गणेश पवार, माऊली गगणे, विशाल देशपांडे, यदा गाडे, संतोष सावंत, नामदेव खंडागळेसह आदींची उपस्थिती होती.