दिल्ली-दिवाळीआधी देशात दहशतवादी हल्ला करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा मोठा प्लान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील महत्त्वाची रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी तशी चिठ्ठी हापुड रेल्वे स्थानकाच्या अधिक्षकांना पाठवली आहे. यानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. तसंच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री उशिरा एक चिठ्ठी उत्तर प्रदेशातील हापुड रेल्वे स्थानकांच्या अधिक्षकांना प्राप्त झाली आहे. यात एकूण ४६ रेल्वे स्थानकं बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या चिठ्ठीनंतर उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसंच प्रवाशांची कसून तपासणी देखील केली जात आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरांच्या साथीनं सर्वांवर करडी नजर ठेवली जात आहे. तसंच जीआरपी, आरपीएफ आणि डॉग स्कॉड देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. शनिवारी रात्री गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबा संघटनेकडून उत्तर प्रदेशातील ४६ रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट घडवणून आणण्याचा कट रचला जात आहे. दहशतवाद्यांनी हापुड रेल्वे स्थानकाच्या अधिक्षकांना एक चिठ्ठी लिहीली आहे. त्यात दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित चिठ्ठीची माहिती अधिक्षकांनी सुरक्षा विभागाला दिली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीपत्रात लखनऊ, वाराणसी, प्रयागराज, कानपूर आणि गोरखपूर सारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची नावं आहेत. गुप्तचर विभागाच्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर वाराणसीतील पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शनवरील सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. तसंच जीआरपी आणि आरपीएफकडून रेल्वे स्थानकावर शोध मोहिम राबवली जात आहे.
ट्रेनमधील पहारा देखील वाढवला
दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर आता ट्रेनमधील पहारा देखील वाढवण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा रक्षक देखील अलर्ट मोडवर आले आहेत. अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांकडून प्रवाशांची आणि त्यांच्यासोबतच्या वस्तू व सामानाची तपासणी केली जात आहे. तसंच डॉग स्कॉडच्या माध्यमातूनही तपासणी केली जात आहे.