Advertisement

अफगाणिस्तानचा नामिबियावर ६२ धावांनी विजय

प्रजापत्र | Sunday, 31/10/2021
बातमी शेअर करा

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्ताननं नामिबियावर ६२ धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने नामिबियासमोर १६१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण नामिबियाचा संघ ९ बाद ९८ धावाच करू शकला. या विजयामुळे भारत आणि न्यूझीलंडच्या चिंतेत भर पडली आहे. अफगाणिस्तानची धावगती पाहता भारत आणि न्यूझीलंडला अफगाणिस्तानला पराभूत करणं गरजेचं आहे. अन्यथा धावगतीच्या जोरावर अफगाणिस्तानचा संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याचा आशा बळावतील. अफगाणिस्तानचे ४ गुणांसह +३.०९७ इतकी धावगती झाली आहे. भारताची धावगती -०.९७३, तर न्यूझीलंडची धावगती -०.५३२ इतकी आहे.

नामिबियाचा डाव
अफगाणिस्ताननं विजयासाठी दिलेल्या १६१ धावांचा पाठलाग करताना नामिबियाचा फलंदाजांची घसरगुंडी झाली. एकापाठोपाठ एक करत फलंदाज तंबूत परतले. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर क्रेग विलियम्स अवघी १ धाव करून बाद झाला. त्यानंतर मायकल लिंगेन (११), निकोल इटॉन (१४), गेरहार्ड इरास्मुस (१२) झेन ग्रीन (१), डेविड विस (२६), जेजे स्मिथ (०), जॅन फ्रायलिंक (६) आणि पिक्की या फ्रान्स (३) धावा करून तंबूत परतला.

अफगाणिस्तानचा डाव
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताल. हझ्रतुल्लाह झझाई आणि मोहम्मद शहजाद यांनी सलामी येत चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र जेजे स्मिथच्या गोलंदाजीवर हझ्रतुल्लाह झझाई बाद होत तंबूत परतला. त्याने २७ चेंडूत ३३ धावा केल्या. या खेळीत २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला रहमनुल्लाह गुरबाज जास्त मैदानात तग धरू शकला नाही आणि इटॉनच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. मोहम्मद शाहजादने मोठे फटके मारत धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रम्पलमॅनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३३ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. नजीबुल्लाह झाद्रनही झटपट बाद झाला. ११ चेंडूत ७ धावा करून इटॉनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तर असगर अफगान ३१ धावा करून ट्रम्पलमॅनच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला

Advertisement

Advertisement