हिंगोली दि.30 – तुम्हीही यंदा दिवाळी फटाक्यांची अतिषबाजी करणार असाल तर ही बातमी तुमच्या अत्यंत कामाची आहे. दिवाळी म्हटलं की रोषणाई आलीच. फटाक्यांची अतिषबाजी या निमित्ताने सर्वच जण करीत असतात. पण, जर तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष दिले नाही तर ही दिवाळी तुमच्या मुलांच्या आयुष्यात अंधकारही करु शकते. हिंगोलीत असाच एक प्रकार घडला आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात असलेल्या गोजेगाव येथे मामाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी आलेल्या भाच्याला त्याचा डोळा गमवावा लागलाय.
हिंगोलीत 9 वर्षाच्या चिमुकल्याच्या डोळ्यात पेटता फटाका शिरला. त्यामुळे या चिमुकल्याचा डोळा निकामी झाला आहे. साईनाथ नामदेव घुगे अस या 9 वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. नुकताच तो त्याच्या मामाकडे आईबरोबर दिवाळी साजरी करायला आला होता. शुक्रवारी सकाळच्या दरम्यान मामाच्या घराबाहेर साईनाथ डबल बार नावाचा फटाका फोडत असतांना फटाका थेट त्याच्या डोळ्यात शिरल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला. त्याला तात्काळ उपचारा करिता नांदेड येथे हलवण्यात आले. मात्र, नांदेड येथे उपचार होत नसल्यामुळे साईनाथला हैद्राबाद येथे हविण्यात आलं आहे. हैद्राबाद येथील एका खाजगी रुग्णालयात साईनाथवर सध्या उपचार सुरु आहेत. सदर डोळा निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांना दिली आहे. फटाक्यात असलेल्या दारुगोळ्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण तर होतच असते. पण, सदर फटका डोळ्यांसाठी अत्यंत घातक असून यामुळे डोळे निकामी होत असतात. यामुळे पालकांनी फटाके खरेदी करताना आणि मुले फटाके फोडत असतांना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, दिवाळी सन तोंडावर असतांना बाजारात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे फटाके विक्रीसाठी आले आहेत. त्यामुळे पालकांनी फटाके खरेदी करताना आणि मुलांनी फटाके फोडताना काळजी घेण्याची गरज आहे. क्षणभर आनंद देणारे फटाके आपल्या मुलांच्या आयुष्यात अंधकार निर्माण करणारे ठरु नये, याची पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.