राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. आजही पत्रकार परिषद घेत त्यांनी आणखी काही नवे आणि गंभीर आरोप वानखेडेंवर केले आहेत. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी वानखेडे, के.पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडेंच्या चालकाच्या सीडीआर तपासणीची मागणी केली आहे. इलेक्ट्रॉनिक तपास झाल्यास काही शंका राहणार नाही, असं मलिक यांचं मत आहे. मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसह सहभागी असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. याविषयी बोलताना मलिक म्हणाले, ही ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. कोविड प्रोटोकॉल असूनही महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती, पोलिसांना या पार्टीची माहिती देण्यात आली नव्हती. गृहविभागालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. या पार्टीत लक्ष्य करण्यात आलेल्या लोकांचे फोटो देऊन त्यांना अडकवण्यात आलं. पण माझ्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे NCB च्या सर्वांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की गोव्यातही त्यांचं मोठं रॅकेट आहे.
ते पुढे म्हणाले, पण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर छापा टाकण्याची वेळ येत होती, वानखेडे कायमच छापेमारी टाळत आले. त्यांच्या चौकशीसाठी NCB मुख्यालयातून जे लोक आलेत, त्यांच्याकडे मी मागणी करतो की त्यांनी क्रूझवरचं सीसीटीव्ही फुटेज तपासावं, प्रत्येक खोलीतलं फुटेज पाहावं. डान्सचं फुटेजही पाहावं. त्यानंतर जगातला एक मोठा ड्रग्जमाफिया तुम्हाला सापडेल. ही पार्टी त्यानेच आयोजित केली होती.