मुंबई-विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे असा घरचा आहेर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. पंकजा मुंडे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा, असा सल्लाच आपल्या सहकाऱ्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारलं असता त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असं म्हटलं. दरम्यान शरद पवार यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीली रवाना झाल्या आहेत. यावेळी मुंबई विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांच्या बोलण्याने आपण लहानही होत नाही आणि मोठ्याही होत नाही अशी प्रतिक्रिया दिली.
मुंडे म्हणाल्या,“मी पवार साहेबांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण मोबाईलवर पाहिलं. मी मोठी नेता नाही हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. तरीही ते असं म्हणाले असतील तर त्यामुळे मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तेवढीच आहे. ते आमच्यापेक्षा मोठे आहेत त्यात काही वाद नाही,” असं त्या म्हणाल्या.
दरम्यान त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका अर्थ विचारण्यात आलं असता म्हणाल्या की, “आम्ही आता ज्या भूमिकेत आहोत त्यात सक्षमपणे काम केलं पाहिजे आणि ते करतही आहोत. कार्यकर्त्यांमध्ये जर आपण सत्तांतर होणार असा विचार निर्माण करत राहिलो तर काम करताना त्यांची पूर्ण ऊर्जा वापरली जाणार नाही. त्यामुळे त्या भूमिकेत मी स्वत: शिरली आहे”. सरकार किंवा विरोधी पक्ष दोघेही जनतेसाठी काम करत असतात. सरकार राहतंय की सरकार जातंय हा विषय महत्त्वाचा नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
प्रजापत्र | Sunday, 17/10/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा