केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, ते एक्स्प्रेस वे वरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करून ती १४० किलोमीटर प्रतितास करण्याच्या बाजूने आहेत. तसेच, यासंबंधी लवकरच संसदेत विधेयक देखील सादर केले जाणार आहे. त्यांनी सांगितले की विधेयकाचा उद्देश विविध श्रेणींमधील मार्गांवरील वाहनांच्या वेग मर्यादेत बदल करणे आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, “वेगाबद्दल अशी धारणा आहे की, जर कारचा वेग वाढला तर दुर्घटना होईल. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह – २०२१ मध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, माझे वैयक्तिक मत आहे की एक्स्प्रेस वे वर वाहनांची वेग मर्यादा वाढवून १४० किलोमीटर प्रतितास केली पाहिजे. ”
तसेच, “चार लेन असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर वेग मर्यादा कमीत कमी १०० किलोमीटर प्रतितास असली पाहिजे, तर दोन लेन असलेल्या मार्गांवर आणि शहरी रस्त्यांसाठी वेग मर्यादा क्रमश: ८० किलोमीटर प्रतितास आणि ७५ किलोमीटर प्रतितास असली पाहिजे. भारतात वाहनांच्या वेग मर्यादेचा मापदंड निश्चित करणं हे एक मोठं आव्हान आहे. ” असंही यावेळी गडकरींनी बोलून दाखवलं.
“कारच्या वेगाबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, ज्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आहोत. आज देशात असे एक्स्प्रेस वे बनले आहेत की, त्या मार्गांवर कुत्रं देखील येऊ शकत नाही. कारण, मार्गाच्या दोन्ही बाजुने बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. विविध श्रेणींमधील मार्गांसाठी वाहनांची कमला वेग मर्यादेत सुधारणा करण्यासाठी एक फाइल तयार करण्यात आलेली आहे. लोकशाहीत आपल्याला कायदा तयार करण्याचा अधिकार आहे आणि न्यायाधीशांना कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार आहे. भारतीय मार्गांवर वाहनांच्या वेग मर्यादेत बदल करण्यासाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केले जाईल. ” असंही केंद्रीयमंत्री गडकरी यांनी यावेळी बोलून दाखवलं.