Advertisement

  'भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना होऊनच जाऊ द्या, आम्ही तयार आहोत'

प्रजापत्र | Friday, 08/10/2021
बातमी शेअर करा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांवरील इन्कम टॅक्स व ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड संतापली आहे. 'कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपकडून विरोधकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. 'मात्र, भाजपच्या दबावाला महाविकास आघाडी सरकार किंवा राष्ट्रवादी अजिबात बळ पडणार नाही. आम्ही घाबरणार नाही. आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होऊनच जाऊ द्या, आम्ही तयार आहोत,' असं थेट आव्हानच राष्ट्रवादीनं दिलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य केलं. 'एखाद्या ठिकाणी चुकीचं वाटत असेल तर त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवता येतो. अजितदादांच्या प्रकरणातही असे खुलासे मागवता येऊ शकले असते. परंतु, केवळ बदनामी करण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत. हा तपास यंत्रणांचा गैरवापर आहे. विरोधकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी ही कारवाई होत आहे. राज्य सरकारला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ,' असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.

 

महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे, असं विधान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अलीकडं केलं होतं. त्याकडं लक्ष वेधलं असता नवाब मलिक म्हणाले, 'महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणं म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणं असं आहे का? आता जे भाजपमध्ये गेले, त्यांनी भाजपच्या गंगेत डुबकी मारली आहे. पश्चिम बंगालमध्ये असंच लोकांना ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये घेतलं गेलं. मात्र, हे लोक पुन्हा भाजप सोडून जात आहेत. महाराष्ट्रातही ईडीच्या भीतीनं लोक भाजपमध्ये गेले. काही लोक आता मंत्रीही आहेत. पण महाविकास आघाडीचे नेते भित्रे नाहीत. कुठल्याही दबावाला आता कोणीही बळी पडणार नाही. भाजप जितक्या कारवाया करतेय, तितक्या ताकदीनं हे सरकार कामाला लागलं आहे,' असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

'भाजपच्या काळात काय-काय झालं हे आता पुढं येईल. आता सुरुवात झाली आहे. कुठल्या मंत्र्यांनी, नेत्यांनी किती बँका बुडवल्या? त्यात किती भाजपवाले आहेत? त्यांनी पैसा कुठं वळवला आहे हे भविष्यात आम्ही बाहेर काढणार आहोत. आम्ही नुसते आरोप करत बसणार नाही. पुराव्यासकट आम्ही ही प्रकरणं समोर आणू,' असंही मलिक म्हणाले.
 

Advertisement

Advertisement