Advertisement

सामान्यांना पुन्हा झटका;घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ 

प्रजापत्र | Wednesday, 06/10/2021
बातमी शेअर करा

घरगुती एलपीजी सिलेंडर पुन्हा एकदा महाग झाले आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमती बुधवारी, ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता तेल कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीमध्ये विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपयांवर गेली आहे. कोलकातामध्ये ९२६ आणि चेन्नईमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलेंडर आता ९१५.५० रुपयांना मिळणार आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

विनाअनुदानीत १४.२ किलो सिलेंडरची नवीन किंमत

 

दिल्लीमध्ये, सबसिडीशिवाय १४.२ किलो सिलेंडरची किंमत आता ८९९.५० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ९११ रुपयांवरून ९२६ रुपये, मुंबईत ८४४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत आता ९१५.५० रुपये आहे. पूर्वी प्रति सिलिंडर ९००.५० रुपये किंमत होती.१ ऑक्टोबर रोजी १४.२ किलो अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. त्याचवेळी, १ सप्टेंबर रोजी १४.२ किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. यापूर्वी, १८ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. गेल्या एका वर्षात दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ३०५.५० रुपयांची वाढ झाली आहे, तर आता अनुदानही येत नाही.

 

तसेच याआधी जुलै आणि ऑगस्टमध्ये किंमती वाढवण्यात आल्या होत्या. मे आणि जूनमध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १० रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत या वर्षी जानेवारीमध्ये ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून ७१९ रुपये प्रति सिलेंडर झाली. १५ फेब्रुवारीला किंमत वाढवून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपयांपर्यंत पोहोचली होती.

 

Advertisement

Advertisement