नाशिक दि.५ – देशभरात सध्या ध्वनीप्रदुषणाची समस्या चांगलीच अडचणीची बनली आहे. शहरात होत असलेली वाहतूक कोंडी आणि त्यात विनाकारण वाजवले जाणारे हाॅर्न ही मोठी समस्या बनली असतानाच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवी संकल्पना राबवणार असल्याचं सांगितलं आहे.
सोमवारी नाशिक येथील आयोजित कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी कर्नकर्कश्य हाॅर्नला पर्याय म्हणून आता भारतीय वाद्यांचे आवाज वाहनाला देण्याच्या योजनेबद्दल सांगितलं. नवीन कायद्यानुसार सर्वच वाहनांना भारतीय वाद्यांचे मधुर आवाजातील ध्वनी देण्याची ही योजना आहे. त्याची ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच रूग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनाला आता रेडीओवर वाजणाऱ्या ध्वनीमध्ये रूपांतरीत करण्यासंदर्भातही त्यांनी बोलून दाखवलं. तसेच मंत्र्याचा ताफा जात असतानाही मोठ्या प्रमाणात सायरन वाजवले जात असल्याने त्याचा कानावर विपरीत दुष्परिणाम उद्भवू शकतो, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.
नवीन हाॅर्नमध्ये बासरी, तबला, हार्मोनियम यांसारख्या पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात येणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं. या संबंधी लवकरच कायदा करून ही योजना कार्यान्वित करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ही योजना कधी लागू होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.