Advertisement

अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका

प्रजापत्र | Thursday, 30/09/2021
बातमी शेअर करा

औरंगाबाद- गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह  राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. 

 

 

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान
विभागीय आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान झाले आहे.  मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 35 लाख 64 हजार 391 इतकी आहे.  90 टक्के पंचनामे झाल्याचा दावा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील  चार हजार तीनशे नव्वद किमीचे रस्तेही खराब झाले आहेत. यासाठी 341 कोटी 37 लाख 98 हजार रुपयांची गरज आहे.  मराठवाड्यात वाहून गेलेल्या पुलांची संख्या 1077 ,यासाठी 45 कोटी 33 लाख 75 हजार रुपयांची गरज आहे, असं विभागीय आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे. 

 

 

116 शासकीय इमारतींचं अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे तर 71 जिल्हा परिषदेच्या शाळाही क्षतीग्रस्त झाल्या आहेत. मराठवाड्यात पावसामुळं 22 लोकांचा मृत्यू झाला आहे.  जवळपास चारशे जनावरं दगावल्या आहेत. 14 पक्की घरं आणि इतर 2072 घरांची पडझड या अतिवृष्टीमुळं झाली आहे.  पूररेषेतील गावांची संख्याही 440 तर ब्ल्यू लाईनमध्ये 97 गाव असल्याची माहिती विभागीय माहिती कार्यालयानं दिली आहे. तर  नऊ गावांना अद्यापही पुरांचा वेढा आहे.  104 गावांचा अद्यापही संपर्क तुटलेला आहे. पुरात 777 लोक अडकले होते. एकूण 1101 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती  विभागीय आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे. 

 

 

काही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा विचार

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी ओला दुष्काळासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की,  शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते.  यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा का याबाबत विचार सुरु आहे. नुकसानग्रस्त जिल्ह्यातील माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. 

Advertisement

Advertisement