मुंबईः शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना सक्तवसुली संचनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून संघर्ष सुरू आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसूळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे.
ईडीने आज सकाळी ८ च्या सुमारास अडसूळ यांना समन्स पाठवले आहेत. तसंच, चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे अशी सूचनाही करण्यात आली होती. ईडीने बजावलेल्या या समन्सवर अडसूळ यांनी उत्तर दिल्याचं कळतंय.
आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती रवी राणा यांनी दिली होती. मात्र, आनंदराव अडसूळ यांना कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. ही रवी राणा यांनी पेरलेली माहिती आहे, असं आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं आहे.