Advertisement

मुलीचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची नातेवाईकांवर नामुष्की

प्रजापत्र | Friday, 24/09/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 
गेवराई दि.२४-बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना  गेवराई तालुक्यातील भोजगावमध्ये घडली.गावात रस्ता नसल्याने नातेवाईकांना प्रेत खांद्यावर घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली. 
 निकिता दिनकर संत  (वय-१७)  असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव असून यानंतर पोलिस पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी घेऊन नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. गावालगत असलेल्या नदीवरील पूलच मागील महिण्यात वाहून गेल्याने रहदारीचा रस्ता बंद आहे. त्यामुळे सदरील मुलीचे प्रेत नातेवाईकांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागली. हे विदारक चित्र गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील आहे.
    दरम्यान पंधरा दिवसांपूर्वीच गेवराई तालुक्यातील चोरपुरी येथील एका आजारी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातील चिखलात गाडी फसल्याने महिलेचा उपचाराअभावी गाडीतच तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यानंतर धुमेगाव जवळील हनुमान नगर येथील एका महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात घेऊन जाताना गाडी रस्त्यात फसल्याची घटना घडली होती. यावेळी मात्र ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून सदरील गाडी बाहेर काढल्याने अनर्थ टळला होता. यामुळे गेवराई तालुक्यातील खराब रस्त्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला होता यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रस्त्याअभावी नातेवाईकांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागल्याने रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भोजगाव लगत असलेल्या अमृता नदीवरील पुल गत महिण्यात नदीला आलेल्या पुरात वाहून गेला होता. तेव्हापासून येथु ग्रामस्थांना रस्त्याअभावी नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. शुक्रवारी सदरील तरुणीचा मृतदेह अक्षरशः खांद्यावर नेण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली असून ही नामुष्की येथील राजकीय उदासीनतेमुळे नागरिकांवर येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Advertisement

Advertisement