पुणे: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल आणि फन टाईम थिएटर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे पेट्रोल-डिझेल बंद करणे ही आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. पेट्रोल-डिझेल बंद करण्याची माझी इच्छा शेतकरी पूर्ण करु शकतात, असं नितीन गडकरी म्हणाले. यावेळी मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमी स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.
शेतकरी माझी इच्छा पूर्ण करतील
माझी आयुष्यात एकच इच्छा असून ती म्हणजे पेट्रोल-डिझेल बंद करणं ही आहे. शेतकरी ही माझी इच्छा पूर्ण करु शकतात. मी राहुल बजाज यांचे चिरंजीव आणि टीव्हीएसचे श्रीनिवासन यांना म्हटलं, जेव्हापर्यंत तुम्ही इथेनॉल स्कूटर बनवत नाही, तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ नका, मी तुमचं काम करणार नाही, असं त्यांना सांगितल्याची माहिती नितीन गडकरींनी म्हटलं. बजाज आणि टीव्हीएसच्या श्रीनिवासन या दोघांनी इथेनॉल इंजिन बनवलं. ब्राझीलमध्ये १०० टक्के इथेनॉल आहे. आता रशियातून टेक्नॉलॉजी आणली ती म्हणजे १ लि. पेट्रोल बरोबर १ लि इथेनॉल आहे.
माझा ट्रॅक्टर वर्षाला 1 लाख वाचवतो
मी राजीव बजाजला बोलावतो आहे. पुण्यातील ऑटो रिक्षा आणि बाईक ज्यावेळी चालतील त्याचं उद्घाटन करण्यास मी येईन. मी तीन चार महिन्यात ऑर्डर काढतोय, बीएमडब्यू पासून मर्सिडीज, टाटा महिंद्रा सर्वांना फ्लेक्स इंजिन पेट्रोलचं बनवावं लागेल, ज्यात शंभर टक्के इथेनॉल, शंभर टक्के पेट्रोल हा पर्याय ठेवावा लागेल. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली तर गाड्या चालतील, प्रदूषण बंद होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. इथेनॉलसाठी मी पंतप्रधानांना विनंती केली,त्यांनी तीन पंप पुण्यात दिले. माझा ट्रॅक्टर सीएनजीवर आहे, १ लाख रुपये वर्षाला वाचवतोय, असं नितीन गडकरी म्हणाले.
वाहनांचे हॉर्नचे आवाज बदलणार
पुण्यात येताना दुख होतं, पुण्यातील हवा शुद्ध होती, माझी बहीण पुण्याची, स्वारगेटजवळ बहिण राहत होती, पर्वतीवर जाऊन खायचं, आताचे पुणे प्रदूषित झालं, जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे, जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं, असं नितीन गडकरी म्हणाले.