Advertisement

संजय राऊत यांच्या 'त्या' विधानावर शरद पवारांकडून अप्रत्यक्ष टीका

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

 मुंबई: आजी माजी आणि भावी या विधानावरून संजय राऊत यांनी दिलेल्या रोखठोक मुलाखतीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आधीच महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरू आहेत. त्यामध्ये आता शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावरून नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार आणि संजय राऊत आमनेसामने येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्यात जुन्या काळात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल आस्था होती. तेव्हा कोथळा काढण्याची भाषा कुणी करत नव्हतं. असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे. मुंबईतील गोरेगाव इथे मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन आज शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

शदर पवार म्हणाले की, ''मृणाल गोरे विरोधीपक्षनेत्या होत्या, अनेक गोष्टींवरून सभागृहात त्या खूप बोलायच्या. सभागृहात एकमेकांवर प्रचंड हल्ले व्हायचे, पण सभागृहाचे कामकाज संपल्यावर तो संघर्ष विसरून सगळे जण एकत्र बसायचे आणि राज्याच्या हिताच्या प्रश्नावर चर्चा करायची, तिथे वाद नसायचा, सुसंवाद असायचा. हा समजूतपणा त्या काळात सातत्याने आम्हाला पहायला मिळायचा. परस्परांबद्दल आस्था असायची, त्यावेळी कोथळा काढू अशी भाषा कुणी काढली नाही.'' 

Advertisement

Advertisement