Advertisement

फडणवीस-जयंत पाटील एकाच गाडीत; नव्या समीकरणांचे संकेत?

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

नंदुरबार : शहादा येथे सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज (दि . १८ ) सप्टेंबर रोजी हॊणार आहे .   . जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. याच कार्यक्रमासाठी फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांचा भावी सहकारी म्हणून उल्लेख केल्याने पुन्हा नवी समीकरणे जुळून येणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली की नाही, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना या नेत्यांकडून नव्या समीकरणांचे संकेत दिले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतरच चर्चेला उधाण

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजप नेत्यांकडून वारंवार हे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला जातो. याआधी भाजपच्या अनेक नेत्यांनी तर सरकार कधी कोसळणार याच्या तारखाच जाहीर केल्या होत्या. अशातच काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य राज्यभर चर्चेचा विषय ठरलं. 'मला माजी मंत्री म्हणू नका, २-३ दिवसांत तुम्हाला काय ते कळेल,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Advertisement

Advertisement