मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शुक्रवार (दि. १७) सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे सकाळी ७. ३० वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. सकाळी ८. २५ वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ आगमन झालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला विरोधाचं गालबोट आहे. मुख्यमंंत्र्यांच्या दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह मनसेनंही विरोध केलाय.
सकाळी ८. ४५ वाजता मुख्यमंत्री हे सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. सकाळी ९. ३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी १०. ४० वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११. ३० वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचं उपहासात्मक स्वागत करण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर
बाबा चौक परिसरात शेकडो एमआयएम कार्यकर्ते एकत्र आले आहेत. हातात स्वागताचे फलक घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर जमा झाले आहेत. बाबा चौकात स्वागतासाठी चारही बाजूने कार्यकर्ते उभे आहेत. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
एमआयएमच्या दोन नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
औरंगाबाद विमानतळाबाहेरून एमआयएमच्या आंदोलनकर्त्या दोन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उद्धव ठाकरे यांच्या एमआयएमकडून होणाऱ्या उपहासात्मक पद्धतीच्या स्वागतास पोलिसांनी मनाई केली आहे.