Advertisement

शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

प्रजापत्र | Sunday, 05/09/2021
बातमी शेअर करा

 पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी पीक फेकून देत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत असून यानिमित्ताने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. माझ्याकडे कृषी खातं असताना शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव देत होतो असं शरद पवारांनी सांगितलं आहे. मात्र सध्या लक्ष दिलं जात नसल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यानिमित्त शरद पवार उपस्थित होते. जुन्नरमधील या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.

 

काय म्हणाले शरद पवार –
“तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत. कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही किंमत मिळत नाहीये. माझ्याकडे १० वर्षीय केंद्रीय कृषी खातं होतं. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं यावेळी मी कटाक्षाने पाळलं. यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोच, मात्र संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करु शकतो. शेतकऱ्यांनी हे करुन दाखवलं आहे,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. “पण दुर्दैवाने केंद्र सरकारमध्ये यासंदर्भात गरज आहे तितकं लक्ष दिलं जात नाही आहे. त्यामुळे शेतमालाच्या किंमती घसरताना दिसत आहे,” असा आरोपही यावेळी शरद पवारांनी केला.

Advertisement

Advertisement