Advertisement

म्हणून मंदिरं उघडता येत नाहीयेत 

प्रजापत्र | Friday, 03/09/2021
बातमी शेअर करा

 

 पुणे- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सण-उत्सवांना पूर्ण मुभा देण्याच्या तयारीत नाही. दहीहंडी उत्सव साजरा करण्यासही राज्य सरकारनं स्पष्ट शब्दांत मनाई केली होती. त्यामुळं गणेशोत्सवावर सरकार नेमके काय निर्बंध लावणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर, सरकारवर टीका होत असतानाही मंदिरं का उघडता येत नाहीत, याचं कारणही अजितदादांनी सांगितलं. 

 

पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. 'आगामी गणेशोत्सवामध्ये नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत. मात्र, पहिल्या दिवशी होणारी गर्दी पाहून निर्बंध लावायचे की नाहीत, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल,' असं अजित पवार यांनी सांगितलं. 'यंदाचा गणेशोत्सव नागरिकांनी साधेपणानं साजरा करावा. घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत. त्या निर्णयाची अंमलबजावणी सर्व गणेशभक्तांनी करावी, असंही ते म्हणाले.

 

'मंदिरं सुरू करण्यासाठी विरोधी पक्षांकडून आंदोलन केलं जात आहे. राज्य सरकारचीही तीच भूमिका आहे. मात्र, केंद्र सरकारनं सण आणि उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं मंदिरं उघडू शकत नाही. भाजपनं आंदोलन करताना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं काय सूचना दिल्या आहेत, ते पहावं,' असा टोला अजित पवार यांनी हाणला.  

 

 

 

Advertisement

Advertisement