मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर छापे टाकले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनाही ईडीने समन्स पाठवले आहेत. यानंतर भाजप नेते करीट सोमय्या सक्रिय झाले असून त्यांनी आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एकीकडे ईडीची कारवाई सुरू असताना आता सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे. भावना गवळी यांनी ७० कोटींची ट्रस्ट चुकीच्या पद्धतीने त्यांच्या पीएच्या नावावर केली, असा आरोप त्यांनी गवळी यांच्यावर केला आहे.
खासदार गवळी यांच्यावर आरोप करताना सोमय्या म्हणाले की, खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या महिला उत्कर्ष ट्रस्टचं परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केले. ते करताना त्यांनी वापरलेल्या कागदपत्रांमध्ये गैरप्रकार करण्यात आल्याची तक्रार माझ्याकडे आली होती.हे खोट्या पद्धतीने ट्रस्टचं रुपांतर कंपनीत करण्यात आले आहे. हे लक्षात घेता या झालेल्या गैरप्रकाराचा तपास व्हायला हवा अशी आमची मागणी आहे.
हेही वाचा... राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार! http://prajapatra.com/3022
या ट्रस्टमध्ये एकूण ७० कोटींची संपत्ती होती. ती सर्व खासदार भावना गवळी यांनी त्यांचा पीए सईद खान याच्या नावावर केली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
महिला उत्कर्ष ट्रस्टचं परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांवर सह्या खोट्या आहेत. यात फसणूक झाली आहे. यामध्ये पुसद नागरी बँकेने ना हरकत प्रमाणपत्र भावना गवळी यांना दिलेले नाही, असे बँकेने आपल्याला उत्तर पाठवले असल्याचे सोमय्या म्हणाले. हे परिवर्तन खोट्या पद्धतीने केल्याचे धर्मदाय आयुक्तांनी देखील सांगितले आहे. या प्रकरणी आपण रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कडे तक्रा दिली. त्या तक्रारीनंतर त्यांनीही हे मान्य केले आहे. म्हणूनच या व्यवहाराचा तपास केला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचेही सोमय्या म्हणाले.