Advertisement

परळीचा डॉ. सुदाम मुंडे पुन्हा जाळयात, जामिनावर सुटल्यानंतर सुरु होते 'पहिलेच धंदे' ?

प्रजापत्र | Sunday, 06/09/2020
बातमी शेअर करा

बीड: आठ वर्षांपूर्वी अवैध गर्भपात प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या आणि न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या परळीच्या डॉ. सुदाम मुंडेला पुन्हा बेकायदा वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपावरून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गर्भपात प्रकरणातील गुन्हेगार असलेला सुदाम मुंडे सध्या जामिनावर आहे, मात्र या काळातही तो पुन्हा अवैध गर्भपात करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने आरोग्य विभागाने मध्यरात्री कारवाई करुन सुदाम मुंडेचा भांडाफोड केला आहे.
अवैध गर्भपात प्रकरणात न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावलेल्या डॉ. सुदाम मुंडेला काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. दरम्यान जामिनावर सुटताच सुदाम मुंडेने पुन्हा पहिलाच धंदा सुरु केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यावरुन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी शनिवारी मध्यरात्री सुदाम मुंडेंच्या दवाखान्यावर छापा मारला. या ठिकाणी गर्भपातासाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर आक्षेपार्ह गोष्टी मिळून आल्याची माहिती आहे.
कोण हा सुदाम मुंडे? त्याचा काय आहे इतिहास?
गर्भपातासाठी सुदाम मुंडेची परळी परिसरात ख्याती होती. तो मोठ्याप्रमाणावर बेकायदा गर्भपात करतो, त्याच्या शेतातील विहरीत गर्भ फेकतो, कुत्र्यांना खाऊ घालतो असे अनेक आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. ८ मे २०१२ ला विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपातानंतर अतिरक्तस्राव झाल्याने बळी गेला आणि तेथुनच सुदाम मुंडेच्या कारनाम्यांचा भांडाफोड झाला होता. पटेकर प्रकरणात त्याला दहा वर्षे सक्त मजुरिची शिक्षा झाली होती.
दरम्यान सदरचा डॉ. सुदाम मुंडे हा परळीतला मातब्बर व्यक्ती समजला जातो. त्याचे मोठ्या प्रमाणावर राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा कायम होते. ८ वर्षांपूर्वी देखील अशीच चर्चा होती. राजकीय संबंधांमुळेच डॉ. सुदाम मुंडेवर कारवाई होत नसल्याचे सांगितले जायचे. मात्र पटेकर प्रकरणानंतर परिस्थिती बदलली होती. आता नविन प्रकरणात काय होते याकडे जिल्हयाच्या नजरा आहेत.

Advertisement

Advertisement