वाशिम : राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईडीचे चौकशी सत्र सुरू आहे. अशात आता शिवसेनेच्या यवतमाळ खासदार भावना गवळी यांनाही ईडीकडून धक्का देण्यात आला आहे. भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती समोर येत आहे. अधिक माहितीनुसार, शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. याची दखल घेतात ईडीने भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम इथं असलेल्या पाच संस्थांवर धाडी टाकल्या.
यामध्ये काय धक्कादायक माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरंतर भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप भावना गवळी यांच्यावर केले होते. यासंदर्भात त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली होती. याचीच कारवाई म्हणून गवळी यांच्या पाच संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड येथे उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रॉडक्ट सर्विस लिमिटेड या कंपन्यांवर अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आले असून आता कसून चौकशी सुरू आहे.
मनीषा कायंदे यांची भाजपवर टीका
दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेला खाली खेचण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचं कायंदे यांनी म्हटलं आहे. 'शिवसेनेचं खच्चीकरण करणं, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं खच्चीकरण करणं आणि स्व:ताचा हेतू साध्य करणं असा भाजपचा रोजचा खेळ सुरू आहे. रोज मंत्र्यांना ईडीच्या नोटीसा पाठवून त्याचा गाजावाजा करायचा. हे सगळं सरकारला बदनाम करण्यासाठीचं षडयंत्र आहे. यातून चौकशी तर होईल पण त्या व्यक्तिला नाहक मनस्ताप देण्याचं काम सुरू आहे', अशी टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.