मुंबई-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक विधानानंतर, राज्यात बराच गोंधळ उडाल्याचे दिसले. या प्रकरणी नारायण राणेंवर अटकेची कारवाई देखील झाली. मात्र त्याच दिवशी रात्री उशीरा महाड कोर्टाने त्यांना जामीन देखील मंजूर केला. दरम्यान, राणेंना अटक करण्यासाठी नेमकं कुणी सांगितलं होतं, याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यामध्ये ते अटकेसंदर्भात बोलताना दिसून येत आहेत, यावरून भाजापाने परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलील असताना, आता ईडी कडून अनिल परब यांना नोटीस बजावली गेली आहे. शिवाय, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे.
तर, अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटद्वारे यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. क्रोनोलॉजी कृपया समजून घ्या. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र’.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.