कोल्हापूर: आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलो तरी त्यांचे गुलाम नाही असा थेट आसूड ओढत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. यातून आघाडीवरची नाराजी माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्या पुढील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न आता चर्चेला आला आहे.
भाजप सोबत केंद्रात आणि राज्यात चार-पाच वर्षे काम केल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपची साथ सोडली. त्यानंतर महाविकास आघाडी सोबत नवा संसार सुरू केला. लोकसभा निवडणुकीत आघाडीने स्वाभिमानीला दोन जागा दिल्या. पण हातकणंगले आणि सांगली या दोन्ही ठिकाणी संघटनेला पराभव पत्करावा लागला. पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीतही संघटनेच्या हाताला फारसे काही लागले नाही.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर शेतकर्यांचे प्रश्न सुटतील, संघटनेला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जाईल, महामंडळावर स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. पण गेल्या दोन वर्षांत यातील कोणतीच मागणी मान्य होत नसल्याचे दिसत आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत शेट्टी यांचे नाव आहे. पण ही यादी राज्यपालांच्या कार्यालयातच अडकल्याने त्याचे भवितव्य आता राज्यपालांच्या हातात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे.
काही साखर कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांची उसाची एफआरपी दिली नाही. याविरोधात शेट्टी यांनी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना लक्ष्य केले. त्यानंतर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही त्यांनी फटकारे मारले. सांभाळून बोला, नाहीतर अवघड जाईल, अशा भाषेत इशारा देत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेतले आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जी मदत केली, ती मदत पुरेशी नसल्याचा आरोप करत त्यांनी कोल्हापूर आणि इस्लामपूर या दोन्ही ठिकाणी आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चातही त्यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. म्हणजे ते ज्या आघाडीत आहेत, ज्या आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यावर सातत्याने टीका करत शेट्टी यांनी आपण प्रथम शेतकऱ्यांचा नेता आहे, नंतर राजकारण आहे हेच पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकऱ्यांचा नेता हीच ओळख अधिक घट्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
एकीकडे हे सारे सुरू असताना दुसरीकडे मात्र त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहिली तर हातकणंगलेची जागा विद्यमान खासदार म्हणून शिवसेनेला अर्थात धैर्यशील माने यांना दिली जाईल. त्यामुळे शेट्टी यांची अडचण होण्याची शक्यता आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आणि पुन्हा लोकसभेला शड्डू ठोकण्यासाठी त्यांना भाजपला जवळ करावे लागणार आहे. त्याचीच सध्या ते तयारी करत असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सध्यातरी त्यांनी आपण स्वतंत्र असल्याचे भासवत महाविकास आघाडीवर टीका सुरू केली आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय म्हणून भाजपला जवळ करावे लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीच्या बहुसंख्य नेत्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडे जाण्याची ही त्यांची पहिली पायरी असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप अडीच वर्षाचा अवकाश आहे. अजून राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वाचा निर्णय झालेला नाही. तो झालाच तर मात्र ते महाविकास आघाडीतच कायम राहण्याची चिन्हे आहेत. पण तसे झाले नाही तर मात्र त्यांना त्यांचा मार्ग मोकळा राहणार आहे.