Advertisement

सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांचं निधन

प्रजापत्र | Monday, 02/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 
उस्मानाबाद दि.२ – मराठवाड्याचे साने गुरूजी अशी ओळख असलेले सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. ते ९० वर्षांचे होते. गेल्या बऱ्याच काळापासून आलुरे गुरुजी आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरच्या अश्विनी रूग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर शैक्षणिक आणि राजकिय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

 

 

६ सप्टेंबर १९३२ साली त्यांचा जन्म झाला. बीडमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर ते मुख्याध्यापक झाले. त्यानंतर १९९० साली ते निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी शिक्षक प्रसारक मंडळामार्फत त्यांच्या भागात २८ शाळा नव्यानं सुरू केल्या. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांना राजकारणात देखील रस होता.१९८० साली त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली. १९८०  साली त्यांनी शेकापचे तत्कालिन आमदार माणिकराव खपले यांचा दणदणीत पराभव केला आणि सर्वप्रथम आमदार झाले. आमदार निधीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी गरिब मुलांसाठी वसतीगृह बांधली. तर शिक्षक आणि आमदार निधीतून मिळाणाऱ्या पैशातून त्यांनी दलित मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली.

 

 

दरम्यान, महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरूजी यांच्या विचाराने ते प्रेरित होते. त्यामुळे मराठवाड्याचे साने गुरूजी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. सामाजिक कार्यासोबतच त्यांनी राजकिय चळवळीत देखील सहभाग नोंदवला होता. काँग्रेसचे ते निष्ठावंत नेते राहिले होते. त्याच्या जाण्यानं मराठवाड्याच्या राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement