मुंबई: राज्यात १६ हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं. येत्या दोन ते तीन दिवसात ही मदत पुरवली जाणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्याला पूराचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं. शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं. माती वाहून गेली. मात्र, सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकारने काही मदत काल जाहीर केली, असं शरद पवार म्हणाले.
मास्कही वाटप करणार
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना मास्क दिलं जाईल. तसेच पुरामुळे आजारी पडलेल्यांवर औषधोपचार करण्यात येईल. २५० डॉक्टरांची टीम या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबाला घरगुती भांडी देण्यात येतील. त्यात दोन पेले, दोन ताट, दोन वाट्या, तवा, आदींचा समावेश असेल. या संपूर्ण १६ हजार कुटुंबांना हे साहित्य देण्यात येईल. तसेच त्यांना अंथरुण पांघरूण देण्यात येणार आहे. सतरंजी आणि सोलापूरच्या दोन चादरीही देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. पूर नियंत्रणावर राज्य सरकार अंतिम धोरण लवकरच जाहीर करेल अशी आशा आहे. काही वर्षापूर्वी माळीण गावातही अशीच घटना घडली होती. त्याचं पुनर्वसन करण्यात आलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, असं ते म्हणाले.