Advertisement

आठ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या गर्भवतीची विष प्राशन करून आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 26/07/2021
बातमी शेअर करा

गेवराई -तालुक्यातील शेकटा येथे आठ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या गर्भवतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. माहेरहून पैसे घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळीनी तिचा अतोनात छळ केला. गर्भपात करण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात आला.यावेळी छळ असह्य झाल्याने तिने  विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.याप्रकरणी पतीसह दिर, जाऊ आणि सासूवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

 

 

         मोनिका भीमाशंकर भारती (वय २२, रा. शेकटा, ता. गेवराई) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. मोनिकाचे वडील दत्ता राजाराम गिरी यांच्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह आठ महिन्यापूर्वी भीमाशंकर नारायण भारती याच्यासोबत झाला होता. सुरुवातीचे चार-पाच महिने चांगले गेल्यानंतर घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेऊन ये अशी मागणी करत पती भीमाशंकर, दिर राहुल, जाऊ मीनाक्षी आणि सासू संजीवनी या चौघांनी मोनिकाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु केला. तिला मारहाण करून उपाशी ठेवण्यात येत असे. याबद्दाल माहिती झाल्याने मोनिकाच्या वडिलांनी उसनवारी करून कसेबसे ७० हजार रुपये जमा केले आणि तिच्या सासरी दिले. तरीदेखील अधिक रकमेसाठी तिचा छळ सुरु राहिला. दरम्यान, मोनिका गर्भवती राहिली असता तिच्या पतीन्ने आत्ताच मूल नको म्हणून गर्भपातासाठी तिच्यावर दबाव टाकला. अखेर सततच्या छळास कंटाळलेल्या चार महिन्याच्या गर्भवती मोनिकाने रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी दत्ता गिरी यांच्या फिर्यादीवरून मोनिकाचा पती, दिर, जाऊ आणि सासूवर गेवराई पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

Advertisement

Advertisement