Advertisement

डोंगर शेळकी पाझर तलाव फुटला

प्रजापत्र | Saturday, 24/07/2021
बातमी शेअर करा

 उदगीर- तालुक्यातील प्रतीपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंगर शेळकी येथील पाझर तलाव तुडुंब भरल्याने आज शनिवार संध्याकाळी पावसाच्या जोरामुळे फुटला. उदगीर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सतत धार पाऊस सुरू आहे. या पावसाने तालुक्यातील सर्व तलाव पूर्णपणे भरले असून ओव्हरफ्लो होत आहेत. अनेक तलावाच्या पाळूवर मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याने पाळू कमजोर होत आहे. या गोष्टीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. २४
जुलै रोजी डोंगर शेळकी येथील पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतातील पिके वाहून गेली आहेत. तसेच अनेक शेतातील मातीही वाहून गेली आहे. या पाझर तलावाच्या सांडव्याचे खोदकाम आत्ता कुठे प्रगतीपथावर असल्याची माहिती समोर येत आहे. इतक्या उशिरा सांडव्याचे काम का सुरू झाले? हा न समजलेल्या प्रश्न आहे.

 

या दुर्घटनेच्या यासंदर्भात माहिती मिळताच उदगीर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येते का? यासंदर्भात काम करायच्या सूचना दिल्या आहेत. उदगीर तालुक्यातील अनेक पाझर तलाव ह्या अतिवृष्टीमुळे धोक्यात आले आहेत. मात्र या बाबीकडे संबंधित खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक पाझर तलाव, साठवण तलावाच्या पाळू वर झाडे मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहेत. पाळूवर वाढणारी झाडे येणाऱ्या काळात पाळूला कमजोर करून तलाव फोडण्यास कारणीभूत ठरू शकतात. याचे गांभीर्य संबंधित खात्याला नाही की काय? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. लघु पाठबंधारे विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल यांना या कामाच्या संदर्भात कोणतेही गांभीर्य उरलेले नाही. असेही बोलले जात आहे. एकंदरीत जनसामान्यांच्या जीविताचा आणि संपत्तीचा विचार करून असे अपघात होणार नाहीत, या दृष्टीने संबंधित खात्याने कठोरपणे काम करणे गरजेचे आहे. अन्यथा गोरगरीब शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा वर पाणी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

Advertisement