Advertisement

  अटकेच्या भीतीने अनिल देशमुख 'नॉट रिचेबल'

प्रजापत्र | Monday, 19/07/2021
बातमी शेअर करा

 

 

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर सीबीआय व ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या 'नॉट रिचेबल' आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीनं ४ कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अटकेच्या भीतीनं ते गायब झाल्याचं समजतं. 

 

 

  मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना बारमालकांकडून पैसे वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे. या प्रकरणात न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सीबीआयच्या तपासाच्या आधारे नंतर यात 'ईडी'नंही लक्ष घातलं. 'ईडी'नं मनी लॉंडरिंग प्रकरणी देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील निवासस्थानावर छापे घातले. देशमुख यांचा स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवालाही अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ईडीनं पुढील कारवाई करत देशमुख यांची ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.मालमत्ता जप्तीनंतर 'ईडी'नं अनिल देशमुख यांना तिसरं समन्स बजावलं होतं. मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तसंच, त्यांचा संपर्कही होत नसल्यामुळं 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी रविवारी देशमुख यांच्या काटोल येथील वडिलोपार्जित निवासस्थानी व नागपूर परिसरातील काही ठिकाणांवर छापे टाकले. देशमुख यांच्या पत्नी व मुलालाही ईडीने समन्स बजावल्याचं वृत्त आहे.

 

चौकशीसाठी ईडीनं याआधी देशमुख यांना तीनदा समन्स बजावलं होतं. मात्र, ते एकदाही ईडीपुढं हजर झाले नाहीत. कधी करोना तर कधी प्रश्नावलीची मागणी करत त्यांनी चौकशीला जाणं टाळलं. आपल्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.

Advertisement

Advertisement