Advertisement

मुंडे भगिनींना डावललं? : राजीनाम्याचं लोण अहमदनगरपर्यंत

प्रजापत्र | Sunday, 11/07/2021
बातमी शेअर करा

 

 

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्याने त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर आपण नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांनी भूमिका मांडल्यानंतर काही तासांतच बीडमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडे भगिनींना डावललं जात असल्याचा आरोप करत राजीनामास्त्र उगारल आहे. शनिवारी अचानक भाजपाच्या बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहोचलं असून, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. या विस्तारापूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला. कराड यांचा समावेश करून मुंडे भगिनींना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची राज्याच्या राजकारणात सुरू आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं, पण मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. असं असलं तरी कार्यकर्त्यांची नाराजी मात्र लपून राहिली नाही.

 

 

शनिवारी (१० जुलै) बीड जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्याबरोबरच अहमदनगरमध्येही दोघांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपाच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीसुद्धा आपल्या राजीनामा दिला आहे. या दोघांनीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.

Advertisement

Advertisement