दिल्ली - मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंडे भगिनींना कोणतंही स्थान दिलं नाही त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. अशात पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली होती. यानंतर आज (११ जुलै) भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्याने जे नाराजी नाट्य रंगले होते त्यानंतर आज पंकजा मुंडे थेट दिल्लीला जात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
भाजपला मला संपवायचं असं मला वाटत नाही
भाजप पंकजा मुंडे यांचं राजकारण संपुष्टात आणत आहे, या शिवसेनेच्या आरोपवर खुद्द भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. भाजपला मला संपवायचं असं मला वाटत नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुर्णविराम दिला. यावेळी त्यांचं सामनाच्या अग्रलेखाकडे लक्ष वेधलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की, मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील. मला वाटत नाही. मी अग्रलेख वाचला नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असं सांगतानाच राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून मी आले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.