Advertisement

उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर

प्रजापत्र | Saturday, 10/07/2021
बातमी शेअर करा

उस्मानाबाद दि.१० -  तालुक्यात काल रात्री पावसाने कहर केला असून सततच्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले भरुन वाहिल्याने 2 वेगवेगळ्या घटनांत पाण्यात वाहून जाणाऱ्या 2 जणांना वाचवण्यात यश मिळले आहे तर बेपत्ता असलेल्या 2 जणांची शोध मोहीम सुरु आहे. वाहून गेलेल्या 28 वर्षीय समीर शेख या युवकाची दुचाकी गाडी सापडली आहे, मात्र युवक अद्याप बेपत्ता आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव आणि समुद्रवाणी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन व्यक्ती वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम विविध यंत्रणांच्या मदतीने सुरू आहे तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे.

 

               

उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजे-बोरखेडा रस्त्यावरील ओढ्यातून बोरखेडा येथील ओढ्यावरील पुलावरून जाताना समीर युन्नूस शेख हे वाहून गेले आहेत. शेख हे मोटरसायकलवर होते. त्यावेळी एका शेतकऱ्याने त्यांना पाण्यात जाण्यास मनाई करूनही वाहत्या पाण्यात गेल्यामुळे ते वाहून गेले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. अद्याप त्यांना शोध लागला नाही. पोलीस, महसूल, नगरपरिषद आणि उस्मानाबाद फायर ब्रिगेडची टीम पाठवण्यात आली आहे.

          दरम्यान समुद्रवाणी या गावातील पुलावरुन एक इंडिका कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघे जण होते त्यापैकी दोघे पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उतरले होते तर दोघे कारमध्ये होते. वाहून जाणाऱ्या कारमधील मेढा येथील गोवर्धन विष्णू ढोरमारे आणि बाबा विश्वनाथ कांबळे या दोघांना गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान समुद्रवाणी येथे पूर पाहण्यास गेलेला एक व्यक्ती पुरात वाहून गेला आहे. तो अद्याप सापडलेला नाही त्यांचाही शोध घेण्याचे कार्य सुरु आहे, असे तहसीलदार माळी यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement