Advertisement

MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यानं  विद्यार्थ्याची आत्महत्या 

प्रजापत्र | Sunday, 04/07/2021
बातमी शेअर करा

 

 

 पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुरसुंगी जवळील गंगानगर येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. फुरसुंगी), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. स्वप्नीने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती. त्याचे आई-वडील शनिवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्नीलने त्याच्या खोलीत गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात हलविले, तेथे डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले.

 

स्वप्नील एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

 

 

कोरोना नसता तर सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. हवे ते ठरवून साध्यही करता आले असते. आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! मी खचलो मुळीच नाही, फक्‍त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! एमपीएससीच्या मायाजालात पडू नका, ‘जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा, अनेक जीव वाचतील,’ अशा शब्दात स्वप्नीलने स्पर्धा परीक्षांबाबत राज्य सरकारच्या चालढकल धोरणावर सुसाईट नोटमध्ये बोट ठेवले आहे.

 

Advertisement

Advertisement