संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.
करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. यंदा गणेशोत्सव जल्लोषात आणि नेहमीच्या थाटात साजरा होईल, अशी आशा होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेनं त्यावर पाणी फेरलं. करोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका ओळखून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारित केली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणच्या गणेशमूर्तीसाठी ४ फूट, तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी घेतलेली असल्याने या नियमावलीवर काय प्रतिक्रिया उमटतात हे पुढील काही दिवसात दिसू शकतं.
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
१) गणेशोत्सवासाठी महामंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक असेल.२) करोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणं अपेक्षित असल्यानं भपकेबाज सजावट करणं टाळावं.३) सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची ४ फूट आणि घरातील मूर्तीची उंची २ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी. ४) शक्य असल्यास गणेशमूर्तीऐवजी धातूच्या वा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं. शक्यतोवर घरच्या घरी मूर्तीचं विसर्जन करावं. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी. ५) स्वच्छेने दिलेल्या देणग्याच स्विकाराव्यात. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करण्याला प्राधान्यक्रम द्यावा. ६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याला प्राधान्य देण्यात यावं. स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.
७) राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत. ८) आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे.
९) नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. १०) गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
११) आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळी करण्यात येणारी आरती घरीच करावी. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणं टाळावं. चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.
१२) महापालिका, विविध मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.१३) करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारसह, आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं.