सर्वत्र तिसऱ्या स्तराचे निर्बंध
मुंबई : राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे. या सत्रात सायंकाळी ५ नंतर संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊनची तरतूद आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्याप्रमाणेच राज्यभर सायंकाळ नंतरची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन राहणार आहे.
महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारनं हे पाऊल उचललं आहे. टप्पा कमी करायचा असेल तर दोन आठवड्याचा ट्रेंड चेक करावा लागणार असल्याची माहिती आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे.