Advertisement

 लग्नसमारंभासाठी नवीन नियमावली जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 23/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड : लग्न समारंभासाठी फक्त ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे.. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र नियम पायदळी तुडवत मोठी गर्दी जमा करून धूमधडाक्यात लग्न समारंभ साजरे होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभासाठी सुधारित कडक नियमावली जाहीर केली आहे.  जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बुधवारी (२३ जून) दिलेल्या आदेशानुसार, 1. सर्व प्रथम विवाह समारंभ आयोजक (वधू पक्ष असो किंवा वर पक्ष अथवा त्रयस्थांमार्फत) यांनी संबंधित मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल इ. ठिकाणी आपणास आवश्यक असलेल्या तारखेची पूर्व नोंदणी करावी.2. संबंधित मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल मालकांनी एका दिवशी केवळ एकाच विवाहास परवानगी प्रदान करावी एका पेक्षा जास्त लग्न समारंभ एकाच दिवशी आयोजित करण्यात येवु नये. 3. आयोजकांना मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल इ. नियोजित तारखेस उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी.4. स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी प्रदान करते वेळेस, उपस्थित सर्व 50 लोकांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांकाची यादी, संबंधित मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल मालकाचे नाव, दुरध्वनी क्रमांक इ. माहिती आयोजकांकडुन घ्यावी. तसेच उपस्थित सर्वांचे अँटीजन / आरटीपीसीआर तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याची खात्री करावी.

 

 

5. स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी प्राप्त होताच उपस्थित राहणारे सर्व 50 लोकांची यादी (नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह) व पोलीस प्रशासनाची परवानगी चे पत्र, संबंधित मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल मालकाचे नाव, दुरध्वनी क्रमांक इ. माहिती स्थानिक स्वराज्य संस्था उदा. ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरी भागात नगर परिषद / नगर पंचायत इथे दाखल करावी.6. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामसेवक व शहरी भागातील मुख्याधिकारी, नगर परिषद / नगर पंचायत यांनी नियोजित तारखेच्या वेळेस संबंधित ठिकाणी भेट देवुन या कार्यालयाचे कार्यालयीन आदेश (१४ जून) मधील आपणास आदेशित केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही अनुसरावी व सदरील ठिकाणी नियोजित वेळेस भेट देवून कोवीड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचा भंग होत असल्यास संबंधित विवाह समारंभ आयोजकावर नियमानुसार भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करावी.
7. लग्न समारंभ आयोजकांनी उपस्थिती लोकांना विवाह स्थळी पुरेसा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे. सर्व उपस्थितांना मास्क घालणे बंधनकारक करावे, लग्न स्थळी अनावश्क गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच एकाच ठिकाणी समुहामधील उपस्थिती टाळावी.

 

8. लग्नाकरिता बैठक व्यवस्थेमध्ये व भोजन व्यवस्थेमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी व त्याप्रमाणे बैठक व्यवस्था व भोजन व्यवस्था ठेवावी. 9. विवाह समारंभ आयोजक यांनी लग्नाकरिता लग्न कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल इ. ठिकाणी विवाहाचे आयोजन न करता राहत्या घरी जरी लग्न आयोजित करणार असल्यास त्यांनी देखील सर्व प्रथम स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असेल. व वरील सर्व नियमावली चे पालन करणे त्यांना देखील बंधनकारक असेल. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागांची राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

 

Advertisement

Advertisement