धारूर दि.२१ (प्रतिनिधी): बनावट (Dharur)देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक विश्वजीत अ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.०२ यांनी रविवार (दि.२०)रोजी रात्री १० वाजता धारूर घाटामध्ये सदर वाहनाचा पाठलाग करून दारूसह १४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम रंगाराव जाधव (वय ३६) रा.शिवाजीनगर माजलगाव, ता.माजलगाव, जि.बीड (Beed),पवन सुरेश मुळे (वय २५) रा.श्रीरंगवाडी, ता.माजलगाव, जि.बीड हे दोघेजण रविवारी बनावट देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाला मिळताच पाठलाग करून रात्री १० वाजता धारूर घाटामध्ये सदर वाहनाला ओव्हरटेक करून थांबविले आणि तपासणी केली असता त्या वाहनात ९० मिली क्षमतेच्या ५० बनावट देशी दारूच्या (देशी दारू संजिवनी बॉबी संत्राचे) बॉक्स आढळून आले. यामुळे तात्काळ कारवाई करीत महिंद्रा कंपनीचे चार चाकी वाहन (एक्सयुव्ही-५००) ज्याचा नोंदणी क्रमांक (एम एच – ४६, पी – ४३१८) व विविध कंपनीचे दोन भ्रमणध्वनी सह एकूण १४ लाख ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करून दारूबंदी कायद्यानुसार दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई (Beed)राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक विश्वजीत अ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.०२ चे दुय्यम निरीक्षक जगदीश व्ही.कोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.बी.कदम व जवान सर्वश्री आर.ए.जारवाल, एस.व्ही.धस, एस.पी.कदम, एस.एस.चाटे, बी.एस.वायबट यांनी केली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जगदीश व्ही.कोरे करीत आहेत.