बीड दि.17 - आता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नववी, दहावीत एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तो शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय (टीसी) मिळणार आहे. संबंधित संस्थेने टीसी दिलाच नाही तर वयानुसार प्रवेश दिला जाणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या राज्यातील शैक्षणिक संस्थांना चाप बसणार आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी शुल्क भरू शकत नाहीत.यासह अन्य काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जावे लागते. त्यासाठी पहिली शाळा सोडताना 'टीसी'ला महत्त्व आहे. अशा वेळी संस्थांकडून विद्यार्थ्यांची Student अडवणूक केली जाते. 'टीसी' नसल्यास दुसरी संस्था अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही. या प्रकारांत संबंधित विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाते, शैक्षणिक नुकसान होते. सर्रास होत असलेला हा प्रकार शासनाच्या लक्षात आला आहे. त्यातून शासनाने नवीन आदेश काढला आहे. यासाठी शासनाने 'आरटीई' RTE Actअधिनियमातील कलम ५ मधील (२) व (३)चा आधार घेतला आहे. विद्यार्थ्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा हक्क आहे.
साधारण स्थितीमध्ये दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळेतील शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्याला तत्काळ टीसी देणे गरजेचे आहे. काही कारणामुळे ते मिळविण्यास उशीर होत असेल किंवा हा दाखला नाकारला जात असेल तर दुसऱ्या शाळेत (शासकीय किंवा अनुदानित) प्रवेश देण्यात उशीर करणे अथवा प्रवेश नाकारणे अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नववी व दहावीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल तर तो 'टीसी'शिवाय द्यावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.