लातूर:-( प्रतिनिधी) - आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या कडील रिक्त पदांची माहिती तात्काळ वरिष्ठ कार्यालयास सादर करावी व त्या अनुषंगाने पदांची भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहा च्या सभागृहात आरोग्य विभागातील भरती या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्याबाबत राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पदांची माहिती तात्काळ द्यावी. तसेच जी भरती प्रक्रिया त्यांच्या अधिकारात आहे ती भरतीप्रक्रिया त्यांनी तात्काळ राबवावी. उर्वरित रिक्त पदांची माहिती जिल्हा निवड मंडळ किंवा वरिष्ठ कार्यालयाला देऊन आपल्या यंत्रणेतील सर्व रिक्त पदे तात्काळ भरून घेण्याबाबत पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
राज्य शासनाच्या 14 जून 2019 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील पद भरती बाबत नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील पद भरतीची प्रक्रिया माहे ऑगस्ट 2021 अखेर पूर्ण करण्यात येईल असे माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिली. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडील पदांच्या भरतीबाबत निवड मंडळामार्फत कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर देशमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परगे यांनी आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे या अनुषंगाने माहिती दिली.